अभिव्यक्ती

 व्यक्त व्हावं!


व्यक्त हो - स्त्री असो वा पुरुष, व्यक्त नक्कीच हो! 

नको देऊस स्वतःला सगळं मनात ठेवण्याचा ताण… बाहेरचे पसारे सावरण्यात किती करशील स्वतःच्या मनाला हैराण?

खरंय… नेहमी नेहमी नसतं कुणी आपलंच ऐकायला ‘ऍवेलेबल’, परिस्थिती पुढे असतोच आपण सारे जण हतबल! 

काही हरकत नाही! काही हरकत नाही, तू बोल स्वतःशी … दुसरं कोणी असो वा नसो, तो वरचा असतोच नेहमी पाठीशी!!

व्यक्त होणं काही फक्त भावनांनाच लागू नसतं, भोवतालाच्या वेगवेगळ्या विषयांवर बोलायला आपल्याला कुणीतरी हवंच असतं

कधी संकोच बाळगून, तर कधी प्रतिक्रियांचा विचार करून स्वतःला गप्प करणं सुरू असतं, पण कशाला?  कुठल्याही, अगदी कुठल्याही विषयावरचं मत मांडायचं स्वातंत्र्य प्रत्येकालाच असतं

हो, मात्र ऐकणार्‍याला ही स्वातंत्र्य असतं! ऐकणार्‍याला ही स्वातंत्र्य असतं आपलं ऐकायचं की नाही ठरवायचं… पण एकाने ऐकून नाही घेतलं म्हणून सगळीकडेच अबोला धरणं चूकीचं असतं….

सोशल मिडिया आहे की! उचल फोन, कर रेकॉर्ड, भरभरून बोल, मोकळं हो! मात्र ‘लाईक्स, डिसलाईक्स’ दोन्हीला ही स्विकारायला ही सिद्ध हो!!


पण काही गोष्टी लक्षात ठेव! ताण नको घेऊ, पण जाणीव ठेव….


व्यक्त होणं म्हणजे फक्त आरडा ओरडा करणं नसतं, समोरच्याला थारा न देता आपलंच घोडं दामटवणं चूकीचं असतं

व्यक्त होण्यात काही नेहमी राग, चिडचिड, एवढंच नसतं, क्षमा, प्रशंसा, आपुलकी, आनंद हे ही तेवढंच महत्त्वाचं असतं…

विचारांचा प्रवाह कधी कधी होत असतो अनावर, पण त्याने काही उद्धवस्त व्हायच्या आत त्याला नक्की सावर….

थांबवता जरी नाही आला, तरी वेग त्याचा संथ ठेव, त्याने स्वतःलाच तर इजा होत नाहीये न, यावरही लक्ष ठेव…

समोरच्यालाही संधी दे सोबतीने व्यक्त व्हायची, अशातूनच गवसते वाट मनःशांतीची

चर्चा कर भांडू नकोस, वादळातून मार्ग काढ, त्याच्या भोवती गुरफटू नकोस…

जे मनात आहे ते सगळं नक्की व्यक्त कर, मात्र त्यावरची दुसरी बाजू ही तेवढ्याच मोकळेपणी स्विकार कर…

आपलीच चूक असल्याचं शेवटी आलंच जर लक्षात, क्षमा ही व्यक्त करायला भीड नको बाळगूस मनात…

जर असेल किंवा दोष इतर कुणाचा, क्षमा करायला ही जोपासावा मोठेपणा मनाचा…

एकदाचं काय ते बोलून टाकून काय असतील ते विषय संपव, मनामधले कलह सगळे एक एक करून कायमचे मिटव…


हे सारं सांगायला फार सोपं आहे, आचरणात आणायल तेवढंच अवघड आहे…

पण आपली मनःशांती आपलंच ध्येय असतं, भोवतालच्यांना ही शांतता देणं सर्वांचंच कर्तव्य असतं…


खरंच व्यक्त होणं ही देखील किती अवघड कला आहे, पण एकदा आत्मासात केली की पुढचा मार्ग सोपा आहे…  


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या आठवणीतली चैत्रगौर

राधेमधली मीरा!