जेजुरीची आठवण

जेजुरी हे नाव वाचून खरंतर कोणाला आश्चर्य वाटेल की 'मोहनकामिनी' या व्यासपीठावर खंडोबाची जेजुरी कशी काय?
पण शेवटी तत्त्व तर एकच असतं. जसा कृष्ण हा मोहन असू शकतो, तसाच खर्‍या भक्तासाठी खंडोबा हा पण मोहनच असतो. 
तर खंडोबा आपलं महाराष्ट्रामधल्यांचं आवडतं दैवत. कोणताही शुभप्रसंग असो, सगळं पार पडण्यापूर्वी आणि सगळं पार पडल्यावर आपण खंडोबाला जावून नक्कीच येणार. ज्याला स्वतःचं कुलदैवत माहिती नाही त्याने कुठे जाव तर खंडोबालाच! असा हा आपला पराक्रमी आणि तेवढाच दयाळू खंडोबा!

तर हा पहिल्यांदा जेजुरीला जावून आल्यावरचा हा माझा छोटासा पहिलाच अनुभव सांगायचा प्रयत्न करते.

आमच्याकडे माहेरी चम्पाषष्ठीचा कुळधर्म असतो. खरेतर खंडोबा आमचं कुलदैवत नाही पण हा कुळधर्म मात्र आमच्याकडे नेहमीच असतो. त्यामुळे मल्हारी मार्तंडाची आरती ही आमच्या नेहमीच्या म्हणण्यातलीच. सुरुवातीला ती आरती आपली म्हणायची म्हणून म्हटली जायची पण जशी मोठी होत गेले तसं ते आरतीमधले शब्द मनावर रुजायला लागले. आपण खरंच काय म्हणतोय, आरतीमध्ये खंडोबाचं काय वर्णन केलंय याची जाणीव व्हायला लागली आणि ते सगळं ऐकून, समजून घेऊन मन भारावून गेलं. तरी आपण जेजुरीला स्वतः जावं, एकदा आरतीमध्ये भेटलेल्या मल्हारीचं प्रत्यक्ष दर्शन घ्यावं असं काही मनात आलं नव्हतं.

प्रत्येक गोष्टीची शेवटी वेळ यावी लागते, ते बरोबरच.. त्याची इच्छा झाली की तशी बुद्धी ही आपोआपच होते आणि सगळं नियोजनही जुळून येतं.
काही महिन्यांपूर्वी लग्न झालं. पण लग्न झाल्या झाल्य सुट्ट्यांचा अभाव असतो, त्यामुळे आम्ही लगेच काही जेजुरीला जायचं नियोजन केलं नाही.

पण गेल्या महिन्यात आठवलं की येत्या काही आठवड्यात जोडून सुट्ट्या येत आहेत, तर काय करावं? 
ह्यांच्या डोक्यात पहिला विचार आला कि जेजुरीला जावू. नियोजनाला सुरुवात केली तेव्हा वाटलं की इतकं ऐन वेळी कसं काय रिझरवेशन मिळेल! पण एकदा ईश्वराने स्वतः आपल्यासाठी एखादं नियोजन केलं की त्यात कोणी ही खंड पाडू शकत नाही. आमची यायची आणि जायची अगदी उत्तम सोय झाली.

जेजुरीला पोहोचल्या क्षणी वातावरणात एक वेगेळंच चैतन्य वाटायला लागलं. त्या छोट्याशा पण मोहक गावात असं वाटतं की जणू कणाकणात मल्हारी मार्तंड वसलेले आहेत. पठाराकडे दुरून जरी बघितलं तरी वाटतं की खंडोबा आपल्याला बोलवतायत. पहाटे उठल्यावर काकड आरती ऐकली आणि माहेरच्या चम्पाषष्ठीच्या आठवणी जाग्या झाल्या! कदाचित खंडोबाशी एक अव्यक्त असं नातं नकळत निर्माण झालेलं होतं.

पूजा करण्याच्या दिवशी जेव्हा गड चढायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या पाहिरीपासून हळद बघून एक वेगळाच आनंद मनात होत होता. चढताना दम लागत होता पण खंडोबानेच बोलावलंय म्हटल्यावर काय, कधी गड चढून झाला कळलंही नाही. 

आधी मनात येत होतं की आता हळद लागलेली साडी खराब होईल की काय? पण तिथे गेल्यावर मात्र हळद लागलेली ती साडी खंडोबाचा, म्हाळसाईचा आणि बाणाईचा प्रसादच वाटू लागली.

दर्शन घेताना आजकाल केवढी गर्दी असते सर्वांनाच कल्पना आहे. त्या गर्दीमधून ही कुठून इथे आलो किंवा परत इथे यायलाच नको ही भावना मनात एकदा ही नाही आली, ही सुद्धा त्याचीच कृपा म्हणायची.
गर्दीमधून गाभार्‍यात जाण्यापूर्वीच जेव्हा मल्हारी मार्तंडाचं भव्य दिव्य स्वरुप बघितलं तेव्हा डोळे दिपून जाणं म्हणजे काय त्याची आयुष्यात पहिल्यांदाच अनुभूती आली. गर्दीमधून मला सुरक्षित न्यायला माझा मल्हारी होताच तसा माझ्याबरोबर! (म्हणजे आमचे हे बराका :)) दर्शन झाल्यावर एक वेगळंच समाधान मनात जाणवत होतं. तिथून परत यावं अशी इच्छाच होत नव्हती. खरंतर सकाळपासून काही पोटात नव्हतं पण त्या वातावरणात तहान भूकेची जाणीच झालीच नाही. गड जसा चढला तसाच अगदी सहजपणे उतरून ही झाला.
तेच मल्हारी मार्तंडाचं चैतन्य घेऊन आम्ही परतलो.

काही क्षणांच्या अवधीतच साठवलेलं ते खंडोबाचं रुप, हळदीचं लिंपन झालेला जेजुरीचा गड आणि ती सोन्याची, अवघ्या २ दिवसातच मनामध्ये घर करून बसलेली छोटीशी जेजुरी अजून ही आठवली तरी मन प्रसन्न होतंय, चेहर्‍यावर हास्य येतंय.

एकदा तरी सर्वांनी तिथे जावून असाच अवर्णनीय अनुभव नक्की घ्यावा अशी आग्रहाची विनंती करते!

तुमचा ही जेजुरी मधला अनुभव नक्की कळवा!!

- मोहनकामिनी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शरणागत

मधुरा भक्ती