माझ्या आठवणीतली चैत्रगौर
अक्षय्य तृतीया! या सणाचं नाव उच्चारलं तरी खूप पवित्र वाटतं. आज चैत्र गौरीचं उद्यापन होणार असल्याने महिनाभर पूजलेल्या या देवी मातेचं तत्त्व आणि जोडीला भगवान विष्णूचं ही तत्त्व या दिवशी पृथ्वीवर कार्यरत असतं. किती सुंदर आणि विलक्षण योग असतो न हा. या चैतन्याचा प्रभावच असा असतो की इतर वेळी फारसे धार्मिककार्यां मध्ये रस न घेणारे लोकही या काही विशिष्ट सणांना अंतःप्रेरणेने आवर्जुन काही न काही विधी करतात. आज खरंतर सुट्टी नाही. रोजचे सगळे व्याप आहेतच, पण सकाळी लवकर उठून, स्नान करून देवाला भरपूर फूलांनी सजवून पूजा केल्याने एक खूप वेगळीच शांतता जाणवतेय. आपसुकच ओठांवर ऊं नमो भगवते वासुदेवाय चा जप होतोय. खूप छान वाटतंय!
ही अक्षय्य तृतीया माझी लग्नानंतरची तशी दुसरी अक्षय्य तृतीया. पण या सणाशी माझ्या माहेराशी जोडलेल्या खूप सुंदर आणि मनाला प्रसन्न करणार्या आठवणी आहेत, त्या काही मागे सुटलेल्या नाहीत.
माझी आई चैत्रगौरीचं व्रत खूप मनोभावे करते. आता तरी रिटायर झाली. पण काम सुरु असताना ही हे व्रत तिने कधी चुकवलं नाही. दरवर्षी ती न चुकता व्रत सुरु होण्यापूर्वी छान चिंच आणि रीठाने गौर स्वच्छ उजळून, धुवून पुसून ठेवते. गौर बसवण्यासाठी सुयोग्य स्थान निर्माण करून, ते स्थान शुचिर्भूत करून तृतीयेला गौरीची मनोभावे स्थापना करते. तिचा आर्टिस्टिक सेन्स काही विचारालाच नको. काय तो गौरीचा सुंदर शृंगार!! किती प्रसन्न ते देवघर!! मन अगदी तृप्त होऊन जातं देवघर पाहून. आणि हा केवळ आरास केल्याचा नाही तर तिच्या मनातल्या विशुद्ध भावाने केलेल्या पूजेचा प्रभाव असतो. चैत्रातली सवाष्ण जेवायला असताना तोंडाला पाणी सुटवणारे ते सगळे पदार्थ. कैरीची चटणी, कैरीचा मेथांबा, कैरीची डाळ, चिंच गूळ लावलेली हरभर्याची उसळ आणि आमरस. आहाहा!!! तिच्या हातचा हा प्रत्येक पदार्थ चविष्ट आणि नामजप करत केलेला असल्याने सात्त्विकतेने युक्त. काय त्याची चव!
मागच्या वेळी हे सगळं मिस केलं मी. पण देवाने बहुधा इच्छा ऐकली.
या वर्षी काही कारणाने चैत्रामध्ये माहेरी जाणं झालं तेव्हा आईने ही लगेच माहेरवाशीणीला सवाष्ण घालायची संधी साधली. सोबत विष्णूरुप जावई सुद्धा होतेच. त्यामुळे सोन्याहून पिवळं!! माझंही मन प्रफुल्लित झालं. खूप मोठ्या कालावधी नंतर गौर भेटली आणि मायेच्या हातच्या त्या सात्त्विक आणि चविष्ट महाप्रसादाची चव लाभली. ओटी भरून माहेरवाशीणीची समाधाने पाठवणी झाली!!
अशी ही माझ्या आठवणीं मध्ये चिरंतर वास करणारी चैत्रगौर!!
ती गौर आणि भगवान विष्णू आपल्या सर्वांना भरभरून आशिर्वाद देवो हीच प्रार्थना.
शुभाक्षय्यतृतीया!!!
छान लेख !
उत्तर द्याहटवाधन्यवाद!!
हटवा