वेड्या मना तळमळसी!
आपण म्हणतो न, 'कळतंय पण वळत नाहीये'. वळत नसण्याचं मुख्य कारण आपलं मनच तर असतं. आपल्याला सर्वांनाच अनुभव येतो की, 'मला हे नकारात्मक विचार नकोत पण ते थांबवताच येत नाहीयेत.' किंवा कोणी दुःखात असताना आपली समजूत काढायला येतं तेव्हाही आपण म्हणतो की, हे सगळं मला कळतंय पण जमत नाहीये.
हे फक्त आपल्यालाच नाही बरंका, तर पराक्रमी महाबाहु अर्जुनाला सुद्धा हा प्रश्न पडलाच होता.
अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला,
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम्।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्॥
म्हणजेच, 'कृष्णा! मन केवढे चंचल, प्रमथनशील, हट्टी आणि बलवान आहे! याचा निग्रह करणं अगदीच अवघड आहे रे!'
त्यावर कृष्ण म्हणाला,
असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्।
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते॥
म्हणजेच, 'हे महाबाहु अर्जुना, मन हे निग्रह करायला अवघड आणि चंचलच आहे. केवळ अभ्यास आणि वैराग्य यानेच याचा निग्रह करणं शक्य आहे.'
मनाचा निग्रह करणं, नकारात्मक विचार कमी होऊन त्यात सकारात्मक विचारांची पेरणी होणं आणि एका शाश्वत स्थैर्याकडे मनाची वाटचाल सुरू होणं, हा एक दीर्घ प्रवासच आहे हे श्रीकृष्णाच्या उत्तरातून नक्कीच कळतं.
श्रीकृष्ण 'अभ्यास' हा शब्द वापरतायत. अभ्यास ही केवळ एक कृती नसून ती हळूहळू आपल्या नकळत आपल्याकडून घडणारी आणि आपल्या खोलवरच्या मनाचं मंथन करणारी एक प्रक्रिया आहे, असं मला वाटतं.
आपली दिशा सकारात्मकतेकडे ठेवून आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिलो, की हा अभ्यास हळूहळू आपल्या जीवनाचा भाग होऊ लागतो. त्याच अभ्यासातून आपण वैराग्य आणि परिणामी मनाचा निग्रह कसा साधला जातो, हे आपल्यालाही कळत नाही.
आता वैराग्य म्हणजे एकलकोंडे होऊन कशातच सहभागी न होणं नाही बरंका. तर सगळ्यात राहूनही स्वतःला कोणत्याही विषयांचं लिंपन न होऊ देणं, हे वैराग्य. अरसिक होणं हे वैराग्य नव्हे, तर सगळ्या प्रकारच्या रसांकडे समबुद्धीने बघता येणं म्हणजे वैराग्य.
हे बोलावंसं वाटलं याचं कारण असं की, आपण आपल्या मनात येणाऱ्या चुकीच्या विचारांबद्दल अनेकदा स्वतःला अकारण कोसतो. अपराधी भावना आपल्या मनात उत्पन्न होते.
पण हे होणं किती साहजिक आहे आणि हे थांबवणंही किती अवघड आहे, हे साक्षात ईश्वराला सुद्धा मान्य आहे की.
आपल्याला सकारात्मकतेकडे जायचं आहे, एवढी इच्छा मनात असली आणि आपण त्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिलो, तर तो अभ्यास घडत राहतो. कधी जाणीवपूर्वक, कधी नकळत.
कदाचित म्हणूनच मनात चुकीचा विचार आला म्हणून स्वतःला दोष देण्यापेक्षा, त्या विचारातून पुन्हा बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं. आज जमलं नाही, उद्या पुन्हा प्रयत्न करायचा. कारण मनाचा निग्रह हा एका दिवसाचा विषय नाही.
शेवटी, 'कळतंय पण वळत नाहीये' ही अवस्था आलीच, तरी स्वतःला दोष देऊ नका. कळतंय ना? मग हळूहळू वळण्याचा अभ्यास करत राहायचा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा