पोस्ट्स

जेजुरीची आठवण

जेजुरी हे नाव वाचून खरंतर कोणाला आश्चर्य वाटेल की 'मोहनकामिनी' या व्यासपीठावर खंडोबाची जेजुरी कशी काय? पण शेवटी तत्त्व तर एकच असतं. जसा कृष्ण हा मोहन असू शकतो, तसाच खर्‍या भक्तासाठी खंडोबा हा पण मोहनच असतो.  तर खंडोबा आपलं महाराष्ट्रामधल्यांचं आवडतं दैवत. कोणताही शुभप्रसंग असो, सगळं पार पडण्यापूर्वी आणि सगळं पार पडल्यावर आपण खंडोबाला जावून नक्कीच येणार. ज्याला स्वतःचं कुलदैवत माहिती नाही त्याने कुठे जाव तर खंडोबालाच! असा हा आपला पराक्रमी आणि तेवढाच दयाळू खंडोबा! तर हा पहिल्यांदा जेजुरीला जावून आल्यावरचा हा माझा छोटासा पहिलाच अनुभव सांगायचा प्रयत्न करते. आमच्याकडे माहेरी चम्पाषष्ठीचा कुळधर्म असतो. खरेतर खंडोबा आमचं कुलदैवत नाही पण हा कुळधर्म मात्र आमच्याकडे नेहमीच असतो. त्यामुळे मल्हारी मार्तंडाची आरती ही आमच्या नेहमीच्या म्हणण्यातलीच. सुरुवातीला ती आरती आपली म्हणायची म्हणून म्हटली जायची पण जशी मोठी होत गेले तसं ते आरतीमधले शब्द मनावर रुजायला लागले. आपण खरंच काय म्हणतोय, आरतीमध्ये खंडोबाचं काय वर्णन केलंय याची जाणीव व्हायला लागली आणि ते सगळं ऐकून, समजून घेऊन मन भारावून गेलं. तरी

शरणागत

 अगाध लीला तुझी मोहना आम्हा कधी उमजेल का? दृष्टी पल्याड सृष्टी सारी दिशा तूच दावशील ना? संकट उंबर्‍यापाशी येता तूच सदैव निवारण केले मजला ते दृष्टीस पडण्या आधीच दृष्टी आड केले…. मीरे इतकी नसेल माझी अविरत प्रीत तव चरणी परी तुझ्याच ठायी असेल सदैव शरणागत जन्मो जन्मी एकच आशा मनात आता तव ध्यास घेऊनी तेवते विसर तुझा रे पडो न कधी मज दुजे न काही मागते, दुजे न काही मागते…. - मोहनकामिनी

कृष्णमय

 तुझेच चिंतन घडो निरंतर सदैव माझे मनी, ये रे कान्हा घेऊनी जा मज तुजसवे वृंदावनी!! - मोहनकामिनी

फक्त तूच…

 अशाश्वताचा विट येऊनी ओढ लागता शाश्वताची नामस्मरणी लीन होता आस लागे श्रीहरीची सखा न कोणी दुजा मज या व्यर्थ नश्वर संसारी तूच एकला सोयरा मज  श्रीहरी रे, श्रीहरी!!!

चाहुल

असेल कोण मोहन माझा, मन जाणते न माझे, परि पाहते अंतरी निशीदिनी मी अजाण रुप त्याचे... डोळे मिटता समोर येते, राजस रुप मम कृष्णाचे, वर्ण तयाचा अदृश्य परि रुप साजिरे मज भासे.. रंग रुपा पल्याड आमुचे निराकार निर्गुण नाते, परि पहावया सगुण रुप ते, अवचित मन हे बावरते... ~ मोहनकामिनी

अधीरता

का रे असा बरसतोस हूरहूर मनी लावतोस तव धारांसह असा हा व्याकुळ पवन धाडतोस…. का धरणीस भेटावसा अधीर एवढा होतोस साधून संध्या समय नेमका चिंब तिला भिजवितोस! साद तप्त धरणीची  जशी तुजला रुचते का रे माझी भक्ती मोहनास न भावते - मोहनकामिनी

मधुरा भक्ती

कान्हा, माझी वाट खडतर सोबतीस ये तू, रे गिरीधर हात द्यावया येती कुणी मज परि मनी माझिया तुझेच चिंतन भोवती माझ्या अनेक जन कुणी देखणे, कुणी लोभस परि गवसत नाही तयात प्रियकर, सांग कुणास येईल तुझी सर तव विरहात मी झाले हतबल साद घालते विरहीणी व्याकुळ दे मज आता तुझेच दर्शन तुज सवे मजला ने रे मोहन - मोहनकामिनी